Tuesday, April 4, 2017

किशोरीताई- संगीताचं अभिजात विद्यापीठ

शास्त्रीय संगीत या संकल्पनेची ओळख खरं तर अगदी लहानपणीच मला झाली. माझे आजी आबा शास्त्रीय संगीत गायक आणि अभ्यासकही... तिसर्‍या वर्षी गाणं शिकायला सुरुवात केली तेव्हा 'सा' लावायला शिकवताना आबांकडून एखादी गोष्ट ऐकल्यासारखं किशोरी आमोणकर नावाच्या बाईंबद्दल ऐकलं ती माझी किशोरीताईंशी झालेली पहिली भेट! मग त्यानंतर अगदी कायमच संगीतातलं जे जे काही मी शिकत गेले त्या सगळ्यात किशोरीताईंच्या गाण्याचे संदर्भ येत राहिले.
षड्ज लावण्यात, तो समजावून घेण्यात अख्खी हयात निघून जाते; प्रत्येक रागात असला तरी प्रत्येक वेळी तो षड्ज वेगळा कसा असतो हे उमगायला किशोरीताईंचं बोट धरण्याशिवाय पर्यायच नव्हता. भूपाचे स्वर लावायला सुरू करण्याआधी त्यांचा भूप ऐकायचा हा तर दंडकच बनला होता. रागदारी गातानाही भावना त्यात ओतणं म्हणजे नक्की काय हे शिकण्यासाठी त्यांच्या बंदिशींकडे धाव घ्यायला लागायची. 'ई'कार, 'ऊ'कार नक्की उच्चारायचे कसे हे सांगतानाही आबांनी नेहमी ताईंचंच ऐकायला सांगितलं.
संगीत ही कला जरी असली तरी त्यातले बारकावे शास्त्रासारखे उलगडायला लागतात, संगीतातल्या सर्जनशीलतेमागेही एक विचार असावा लागतो, रागातल्या स्वरांशी एकरूप झाल्याशिवाय रागाचा म्हणून जो भाव असतो तो गळ्यातून उतरु शकत नाही या वरवर साध्या वाटणार्‍या पण साध्य करायला अतिशय कठीण असणार्‍या गोष्टी समजावून घ्यायला किशोरीताई नावाच्या विद्यापीठाची पायरी चढावीच लागली.
एखाद्याचं गाणं हा प्रत्येक वेळी नवीन अनुभूती कशी देतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे किशोरीताईंचं गाणं.. गाण्यात आणि गाणं शिकण्यात शिस्त आली ती ताईंच्या कडक शिस्तीच्या कहाण्या ऐकूनच.. माझ्यात गाणं समजण्याची जी काही थोडीफार कुवत आहे ती किशोरीताईंच्या गाण्याची पारायणं केली म्हणूनच..
आज सकाळी त्या गेल्याची बातमी ऐकल्यापासून त्यांचं पुन्हा पुन्हा ऐकतेय, आज नव्याने ते समजतंय.. हा असा अभिजात अनुभव देऊ शकणार्‍या फार थोड्या लोकांमध्ये किशोरीताई अगदी अग्रक्रमी आहेत.
पर्व संपलं असं म्हणणं त्यांच्या जाण्याचं वर्णन नाही. त्यांचं पर्व सुरूच राहणार, त्यांनी निर्माण केलेल्या स्वर्गीय स्वरांतून, त्यांच्या अजरामर रचनांतून, अविस्मरणीय आवाजातून आणि सांगीतिक विचारांच्या त्यांनी दिलेल्या शिकवणीतून!

No comments:

Post a Comment